प्रेमाचा महिना !

Rajasee : Elegance Personified

प्रेमाचा महिना !

मुग्धाने @mugdha.5 राजसीचं आणि माझंही इंस्टाग्राम प्रोफाइल शोधून काढलं आणि मला मेसेजेस आले . ती म्हणे , तुमची संकल्पना ,तुमचं काम फार आवडलंय . मला साखरपुड्यादिवशी राजसीचीच साडी नेसायचीय आणि होणाऱ्या नवऱ्यासाठी जॅकेट बनवता येईल का? त्याच्याशी बोलते आणि कळवते . तिचं लडिवाळ लिहिणं आवडू लागलं. मग आम्ही whatsapp वर एकमेकींना लिहू लागलो . ओंकारशी फोनवर बोलणं होऊ लागलं . दोघे मिळून अनेकवेळा बोलली . त्यांच्या नात्याची घट्ट वीण मला जाणवू लागली आणि मी सुखावू लागले . अजून प्रत्यक्षात नं भेटलेली ही मुलं मला फारच आपली वाटू लागली . प्रेम ह्या मूल्यावर यांची नितांत श्रद्धा आहे हे त्यांच्याशी बोलताना जाणवायचं . 

पुण्यात सुटीदिवशी भेटून , साडी आणि उपरण्याच्या डिज़ाइनबद्दल बोलू असं ठरत होतं पण ह्यांनी मुंबईला येतो आम्ही ! भेटू . असं सांगितलं. म्हटलं हे छान . 

एक दिवस आले दोघेही . गप्पागोष्टी झाल्या . “घर छानय “ अशी पावती दिली दोघांनी . घरातल्या लाकडी फर्निचरच्या नक्षीकामाकडे ओंकारचं लक्ष जाणं अगदी स्वाभाविक होतं . सकाळची वेळ होती . ह्या तरुण मुलांना आवडतील असे पेस्तो चटणी लावलेले टोस्ट आणि रंगीत सॅलेड केलेलं होतं . शहाळ्याचं कोकोनट पंचही होतं . हे पदार्थ छान नटवून , छानशा भांड्यांमध्ये ठेऊन ट्रे पुढे केला तर हा मुलगा म्हणे ,” आमचं जरा डाएट सुरूय “ मनात म्हटलं असेल पण हे सगळे पदार्थ प्रकृतीला उपकारक असेच आहेत . मग हा मुलगा नको का म्हणतोय ? ओंकार म्हणे आमचं जरा पथ्यपाणी सुरूय . मुग्धाला काही त्रास होत होता त्यामुळे खाण्यापिण्याची पथ्यं पाळावी लागतात आणि वेळाही . ओंकार @omkarekbote7 हे सगळं सांगताना मात्र ,” आमचं खाणंपिणं , आमच्या वेळा , आमचं काम “ असं सगळं ‘आमचं’ म्हणून सांगत होता . प्रत्येक वेळी “सुखी रहा “ हा सहजोद्गार माझ्या तोंडून निघत होता . समधर्मी भेटल्याचा आनंद झाला होता . डिज़ाइन, ह्या मुलांच्या प्रेमाची गोष्ट आणि मुग्धाच्या प्रकृतीबद्दल बोलणं झालं . सगळं ठरलं . आम्हा तिघांमधला वाढता संवाद छानच वाटू लागला . 

नैसर्गिक साधनांनी सजलेल्या ठिकाणी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला . जोडी छानच दिसत होती . साडीच्या पदरावरचं आणि उपरण्यावरचं काम दिसेल असे विशेष फोटो काढून घेऊन राजसीला पाठवले . फार आनंद दिला या मुलांनी आणि या कामाने 

सुखी रहा.

Subscribe now to explore RAJASEE’s latest collections and special updates of RAJASEE designs!!!