Rajasee

राजसी: कला संगम

भारतीय स्त्री ओळखली जाते ती तिच्या पेहरावावरून. हां तसं म्हणाल तर आता भारतीय स्त्री कुठलाही पोशाख घालून आत्मविश्वासाने  वावरते. पण जगामधे तिची ओळख मात्र तोच पेहराव आहे, ज्यामुळे तिचं सौंदर्य अधिक खुलून येतं. बरोबर ओळखलंत मी साडीबद्दलचं बोलतेय..

भारतीय स्त्रीसाठी साडी म्हणजे केवळ ६ वारी कापड नसतं. साडीचं आणि भारतीय स्त्रीचं अतूट नातं असतं. साडीमध्ये तिच्या भावना गुंतलेल्या असतात. लहानपणी आईच्या, आजीच्या साडीच्या पदराशी खेळून झालेलं असतं. तशीच साडी आपणही नेसावी ही इच्छा तेंव्हापासून मूळ धरते. मग हट्ट करून एखाद्या ओढणीलाच साडी म्हणून नेसवून आई तो हट्ट पुरा करते. पुढे हळूहळू साडी विषयी ओढ वाढत जाते.

मग पहिली साडी.. तिचं कौतुक ते कित्ती !! बऱ्याच मुली पहिली साडी जपून ठेवतात. आजकाल तर दहावीच्या निरोप समारंभात देखील साडी नेसली जाते. मग कॉलेज मध्ये तर काय, साडी डे , हा डे , तो डे आणखी वेगवेगळ्या डे ज ला कौतुकाने साडी नेसली जाते. 

पुढे लग्नात तर हळदीची, मेहंदीची, संगीताची, लग्नातल्या विधी मधल्या दोन तरी… पुढे माहेरी गेल्यावर, मंगळागौरीची, गरोदर असताना, डोहाळे पुरवताना, आई झाल्यावर, सासू झाल्यावर, दिवाळीच्या पाडव्याची, संक्रांतीची, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमात, सभासमारंभात साडी ही तिची सोबतीण असते. आईची, आजीची साडी तर त्या गेल्यानंतर कितीतरी वर्षांनी देखील आईच्या/ आजीच्या मायेचा उबदार स्पर्श करवून देतात. असं एक छान वेगळं प्रेमाचं नातं साडीचं आणि भारतीय स्त्रीचं असतं. 

राजसी मध्ये साडी बनवताना आम्ही या नात्याचाच प्रामुख्याने विचार केला. राजसी मधली प्रत्येक साडी ही हळुवार हाताने, मायेने बांधली गेली आहे. कसलाही यांत्रिकपणा यात नको म्हणून कुठल्याही यंत्राचा त्यासाठी वापर केला गेला नाही. हाताने विणलेली साडी घ्यायची हे ठरवलं. कसलाही कृत्रिमपणा त्यात आणला नाही. 

आता साडी तर झाली. पण त्या साडीला सजवायला नको का ? म्हणजे एखाद्या कार्यक्रमात नुसतं टेबल खुर्चीच असेल तर चांगलं दिसेल की त्यावर एखादी ताज्या फुलांची फुलदाणी ठेवली तर छान वाटेल ? 

अगदी हाच फॉर्म्युला आम्ही राजसी मध्ये वापरला.

पण एक ठरवलं होतं की जे काही असेल ते इथल्या संस्कृतीमधील, इथल्या मातीमधील असलं पाहिजे. आपली संस्कृती याबाबतीत खरोखर समृद्ध आहे. इथे आमच्या मदतीला आली ती भारतीय शिल्पकला ! 

भारतातील अनेक शतकांपूर्वीची मंदिरे पाहताना आणि केवळ दगडावर कोरलेली शिल्पकला पाहताना, आश्चर्य वाटायचं. कोणार्क मधील सूर्य मंदिर खरंतर एक आश्चर्य मानलं जावं असं आहे. संपूर्ण कालचक्र त्याठिकाणी आहे. आणि दगडापासून बनविलेल्या एका चाकावर ती कोरली आहेत. तसचं केवळ एका दगडावर शिखरापासून सुरुवात करून पायापर्यंत कोरली गेलेली वेरूळ लेणी देखील अशीच.  

काळाच्या ओघात अनेक नैसर्गिक आणि मग्रूर मानवी आक्रमणं झेलून विद्रूप होऊन लुप्त होत चाललेलं हे वैभव परत उभं करता येणार नाही याची खंत पण वाटायची. विजयनगरचे साम्राज्य नष्ट करायला, विद्रूप करायला सहा महिने लागले म्हणतात, मग ते तयार करताना किती सायास पडले असतील ? 

या शिल्पांवरील सुंदर, निर्भिड, आत्ममग्न स्त्रिया पाहताना नेहमीच स्तिमित व्हायला व्हायचं. 

अनेक ठिकाणच्या मंदिरात विशेषत: होयसाळ मंदिरावरील स्त्रिया पाहताना तर त्या ओळखीच्या आहेत असं नेहमी वाटतं. यातलीच एखादी पूर्वीची मी असेन, माझ्या मैत्रिणी असतील असं उगीचच वाटून जायचं. कुणी पुस्तक वाचणारी, कुणी नृत्य करणारी, कुणी शृंगार करणारी, कुणी आकाश निरीक्षण करणारी, कुणी युद्ध करणारी, आपल्या बाळाकडे ममत्वाने पाहणारी ..या सगळ्या स्त्रिया, ज्यांची नावं कुणाला माहीत नाहीत आणि कधी कळणार पण नाहीत अशा स्त्रिया आपल्या ओळखीच्या का वाटाव्यात ? बरं हे काम दगडावर इतकं रेखीव केलंय की त्या जिवंत वाटाव्यात. 

हा आपला वारसा आहे आणि आपण हा टिकवला पाहिजे, दुर्लक्षित राहिलेला हा वारसा अनेक लोकांपर्यंत नेला पाहिजे असं सतत वाटायचं, पण काय करावं हे कळत नव्हतं.

मग विचार आला याच स्त्रिया आपल्या साडीवर आणल्या तर !! आणि स्त्रियाच नाही तर इथली शिल्पकला साडीवर आणली तर ती साडी अधिक भारतीय वाटेल. मग एका साडीवर प्रयोग म्हणून एक स्त्री शिल्प रंगवण्यात आलं. आणि हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला. 

मग त्या साडीला अजून थोडा उठाव देण्यासाठी हाताने एम्ब्रॉयाडरी करण्यात आली. ज्यामुळे साडी परिपूर्ण बनली. 

राजसी मध्ये प्रत्येक साडी ही अशी बनवली जाते. प्रत्येक साडीची स्वतंत्र ओळख आहे. एकसारखी दुसरी होणारच नाही, काहीतरी वेगळंपण त्या साडीत असेल. 

या साड्या बनवण्याचं संपूर्ण श्रेय खरंतर आमच्या  अत्यंत मेहनती कलाकारांना जातं, जे हा वारसा टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. या सगळ्यामागची प्रेरणा आणि संकल्पना आहे ती डॉक्टर राजश्री कुलकर्णी यांची.

म्हणूनच म्हटलं हस्तकला, शिल्पकला, चित्रकला, रंगकला या सगळ्यांचा संगम म्हणजेच राजसी. भारतीय कला टिकविण्याचा प्रयत्न म्हणजेच राजसी !!  

वि प्रे सू: या सगळ्या साड्या तुम्हाला आमच्या वेबसाईटवर बघता येणार आहेत. जी अगदी थोड्याच दिवसात सुरू होणार आहे. 

आज या साडीची एक झलक तुम्हाला खालील व्हिडिओ मधून दिसेल.

मनीषा

व्हिडिओ क्रेडिट : प्राची गरुड कुलकर्णी, दिपाली गावडे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *