रा.रा. अर्थात राजश्रीची राजसी
खरं तर राजसी बद्दल लिहायचं झालं तर प्रथम मला तिच्या निर्मातीबद्दल, आमच्या सखीबद्दल लिहिणं आवश्यक वाटतं.
जिने ह्या राजसी ला निर्माण केलं त्या निर्मातीचा जीवनप्रवास अद्भुतच म्हणावा लागेल. एम.ए. मराठी केलेली, अतिशय हुशार, प्रचंड मेहनती अशी आमची सखी. सतत नाविन्यपूर्ण करण्याचा ध्यास असल्यामुळे तिने आकाशवाणी, मुंबई येथे वृत्त निवेदन आणि बातम्यांचे भाषांतर करण्याचे काम केले. पाहता पाहता आमची ही सखी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठातील पदव्युत्तर (PG) विभागात मराठीची प्राध्यापक झाली. सर्व विद्यार्थिनींमध्ये लोकप्रिय बनून विद्यापीठाच्या अनेकविध कार्यक्रमांची धुरा तिने समर्थपणे सांभाळली. या काळात, अनेक दिग्गज कलाकार आणि साहित्यकारांबरोबर हिचे मैत्र जुळले. एक दिवस मी पी.एच्.डी. करतेय अशी मॅडमनी घोषणा केली. संसार, प्राध्यापकी सांभाळत, स्वतःची दुखणी-अडचणी बाजूला ठेवत, ओठांवरचं हास्य कायम ठेवत, चिकाटी आणि मेहनत घेऊन आमची ही सखी ना घ देशपांडे यांच्या कवितेतील नादमाधुर्य आणि चलच्चित्रमयता ह्या विषयात पी.एच्. डी. यशस्वीपणे पूर्ण करून डाॅ. राजश्री पाटील कुलकर्णी झाली. ह्या सर्व प्रवासात तिचे पती श्री. महेश कुलकर्णी आणि लाडका लेक कुमार असीम नेहमीच मोलाची साथ देतात.
ओठांवर हास्य आणि ह्रदयात लडिवाळ माया असलेली ही सखी म्हणजे जगन्मित्रच. या माहेरपणाला माझ्याकडे असा प्रेमळ आग्रह करून तिच्या सर्व सख्यांचे लाड करून खाऊ-पिऊ घालणारी अशी ही सखी.
जेवढी विद्वान तेवढीच कलेवर निस्सीम प्रेम करणारी. मुळात, कलात्मक दृष्टी असल्यामुळेच तिने एका जात्याचं सुंदर सेंटर टेबलमध्ये रूपांतर केलं ! तिच्यातील ह्या कलात्मकतेचा उत्तम पुरावा म्हणजे तिचे पुण्यातील राजेशाही घर.
वृक्षवल्ली आम्हां सोयरे असलेल्या राजश्रीने दवात भिजलेले, स्वतः मायेने रुजवलेल्या जास्वंदी, मोगरा, चाफा अशा नानाविविध फुलांचे फोटो पाठवले की आमची सकाळ सुद्धा सुगंधित आणि ताजीतवानी होते. जीवनाचा खरा आनंद घेण्याचं तिचं कसब वाखाणण्यासारखं आहे.
अशा ह्या आमच्या सखीचे पुढील कलात्मक पाऊल म्हणजे कलाविश्वातील एक अनोखे दालन राजसी.
ह्या राजसीची कल्पना प्रत्यक्षात उतरवणं काही सोपं काम नव्हतं. भारतीय स्त्रीची अभिरुची आणि भावनेचा एक नाजूक बंध असणारी, जिच्यात स्त्रीचं सौंदर्य खुलतं अशी साडी बनवायची पण तिला एक आगळंवेगळं कलात्मक रूप देऊन असं राजश्रीने ठरवलं. कुठेही यंत्राचा वापर न करता भारतीय शिल्पकलेतील उत्तम शिल्प एकेका साडीत चित्रीत केली. साडीचा पोत, रंग आणि शिल्प चित्रांचा रंग यांचा सुंदर मिलाफ झालेल्या ह्या साड्यांवर भरतकाम करून लिहिलेले मेघदूत आणि ऋतुसंहार यातील श्लोक, गाथासप्तशती मधील श्लोक तसेच कुमार गंधर्वांची बंदिश म्हणजे सोने पे सुहागा ! साडीवरील जरीकाम, पदरावरची मोत्यांची किनार, लोभस गोंडे साडीची शोभा वाढवतात. राजसीची प्रत्येक साडी एक वेगळी गोष्ट सांगते. त्यात कधी पत्रलेखा सापडते तर कधी दूर देशी गेलेल्या नवऱ्याची व्याकुळ पत्नी. कधी एखादी सुंदरी आरशात स्वतःचं रुप न्याहाळते तर कधी एखादी नर्तिका दिसते. एखादी वीरांगना लढताना दिसते तर एखादी माय आपल्या बाळाकडे ममत्वाने पाहताना दिसते. खरंच, अशा अनेक उत्तमोत्तम साडया बनवणाऱ्या सर्व गुणी आणि मेहनती कलाकारांचे कौतुक करावे तितके थोडेच.
माझी खात्री आहे की राजसीच्या चित्रकथा आणि सुंदर विणकाम असलेल्या साड्यांच्या प्रेमात तुम्ही निश्चितच पडाल. कदाचित यातील एक कथा तुमची, तुमच्या आवडीची असू शकेल. राजसीची अद्भुत आणि नाविन्य असलेली साडी तुमच्या संग्रही ठेवायला तुम्हाला निश्चितच आवडेल.
मग कधी भेट देताय आमच्या रा.रा.- राजश्रीच्या राजसीला?
सौ शिल्पा सलिल दिघे